बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड! ममता बॅनर्जींचा राजीनामा नाकारला, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप


नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रतिक्रिया दिली.

ममता बॅनर्जी यांनी थेट आरोप करत म्हटले की, “आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे.” त्यांच्या मते, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. 2004 नंतर इतका दबाव आणि अन्याय मी कधी पाहिला नाही. एसआयआर प्रक्रियेतून सुमारे 90 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आणि सुमारे 100 जागांवर अनियमितता झाली.”

ममता बॅनर्जी यांनी भाजपवरही थेट आरोप करत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीत हस्तक्षेप करण्यात आला. तसेच, भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या ठामपणे म्हणाल्या की, “माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. मी राजभवनात जाऊन राजीनामा देणार नाही. आम्ही ही लढाई सोडणार नाही आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करू.”

याचवेळी त्यांनी ‘इंडिया आघाडी’कडून मिळालेल्या पाठिंब्याचा उल्लेख करत सांगितले की, सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव यांनी फोन करून समर्थन दिले आहे. तसेच अखिलेश यादवही लवकरच भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपवर गंभीर आरोप करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यात दलित आणि आदिवासी समाजावरही हल्ले झाले असून पोलिस यंत्रणा निष्क्रिय राहिली. त्यांनी स्वतःवरही हल्ला झाल्याचा दावा करत, भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे सांगितले.

या घडामोडींमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!