मोठी बातमी! अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या विनोद देशमुखांना अटक, काय आहे प्रकरण?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.व्यवसायिक मनोज वाणी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अर्बन सेलचे राज्यसंघटक विनोद देशमुख यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटक विनोद देशमुख यांना पुन्हा शहर पोलिसांनी अटक केली असून मनोज वाणी यांच्या रामदास कॉलनीतील कार्यालयावर हल्ला करून दरोडा तसेच जीव घेण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात विनोद देशमुख रामानंदनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली होती .आता शहर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल केला असून त्यांना शहर पोलिसांनी देखील अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणात व्यावसायिक तथा फिर्यादी मनोज वाणी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘अजित पवार यांच्या दबावामुळे त्यांना पोलीस अटक करत नाहीत’ असा गंभीर आरोप देखील केला होता. त्यानंतर आता शहर पोलिसांच्या झालेल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या अटकेमुळे आगामी निवडणुकावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
