ठाकरे गटाला मोठा धक्का ; पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार भाजपच्या वाटेवर ; पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण…

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपकडून एक एक नेते गळाला लावण्याची तयारी सुरूच आहे. अशातच आता सोलापुरातील सांगोल्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिवसेना ठाकरे सेनेचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपक साळुंखे शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. आज या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. माजी आमदार दीपक साळुंखे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात काल दुपारी बैठक झाली. सांगोल्यात ही बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, काल त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत दीपक साळुंखे हे ठाकरे सेनेचे उमेदवार होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते पक्षापासून अलिप्त होते. दरम्यान, आता दीपक साळुंखे यांचा भाजप पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली. दिवाळीनंतर साळुंखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

