SBI खातेदारांना मोठा झटका! ATMमधून पैसे काढताना वाढणार शुल्क, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबरपासून बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी कॅश विड्रॉव्हलच्या शुल्कात बदल होणार आहे. महिन्यातील 4 मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारासाठी आता 15 रुपये अधिक GST शुल्क आकारले जाणार आहे.
सध्या BSBD खातेधारकांना महिन्यातील पहिल्या 4 कॅश विड्रॉव्हलसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. यामध्ये SBIच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, SBI ATMमधून पैसे काढणे तसेच इतर बँकांच्या ATMचा वापर यांचा समावेश आहे.

मात्र, 4 मोफत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पाचव्या आणि त्यापुढील प्रत्येक कॅश विड्रॉव्हलवर सध्या 10 रुपये अधिक GST शुल्क आकारले जाते. 1 ऑक्टोबरपासून हे शुल्क वाढून 15 रुपये अधिक GST होणार आहे.


महत्त्वाची बाब म्हणजे महिन्यातील 4 मोफत व्यवहारांची मर्यादा कायम राहणार आहे. म्हणजेच ग्राहकांना महिन्यातील पहिल्या चार रोख व्यवहारांसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. केवळ पाचव्या व्यवहारापासून वाढीव शुल्क लागू होईल.
ATM व्यवहार अयशस्वी झाल्यास किंवा केवळ बॅलन्स तपासणीसारख्या गैर-आर्थिक व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय BSBD खात्यांच्या चेकबुक शुल्कातही बदल होण्याची शक्यता आहे. एका आर्थिक वर्षातील पहिल्या 10 चेक पानांचे चेकबुक मोफत मिळेल. त्यानंतर 10 पानांच्या चेकबुकसाठी 40 रुपये अधिक GST, तर 25 पानांच्या चेकबुकसाठी 75 रुपये अधिक GST शुल्क आकारले जाऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
त्यामुळे BSBD खातेधारकांनी महिन्यातील रोख व्यवहारांचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी शक्य असल्यास UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करता येईल.