लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेला मिळणार मोफत साडी, राज्य सरकारचा निर्णय…

मुंबई : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांना आता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साडी मिळणार आहे. कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाला.
होळीच्या निमित्ताने ही साडी दिली जाणार होती, मात्र याला विलंब झाला होता. या योजनेअंतर्गत राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण करण्यात येणार होते. मात्र, काही कारणास्तव काही भागात महिलांना साडी मिळालीच नाही. यामुळे आता ही साडी मिळणार आहे. सध्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्याचे वाटप करण्यात येईल. तसेच सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले असून त्यामुळे विणकरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे दुहेरी फायदा झाला आहे.
दरम्यान, ही योजना 2028 पर्यंत पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येत आहे. यामुळे महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
या योजनेचा लाभ जवळपास 24 लाख 87 हजार 375 कुटुबांना होणार आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 1500 रुपये दिले जातात, मात्र अनेक महिलांना अपात्र केल्याने ही योजना बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे या महिलांचे याकडे लक्ष लागले आहे.