सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार खास गिफ्ट, वाटपही झालं सुरू, तुमच्यापर्यंत पोहोचलं का? जाणून घ्या..

जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आता पैशांसोबतच साडी देखील भेट देणार आहे.
राज्यात या योजनेतून साडी वाटप सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंत्योदय योजनेत नाव असणाऱ्या तब्बल ४३ हजार ३१८ महिला लाभार्थिंना मोफत साडी मिळणार आहे. राज्य सरकारने पुढील पाच वर्षांसाठी अंत्योदय योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी एक साडी देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
परंतु, विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीमुळे साडीवाटप रखडलं होतं. आता मात्र साडी वाटप सुरू झालं असून २५ हजार महिलांना साड्या मिळाल्या आहेत.
राज्य सरकारकडून मागील वर्षी अंत्योदय शिधापत्रिकेत नाव असलेल्या एका महिलेस साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, यानुसार, यंदा होळी सणाच्या पूर्वीच साडी वाटप सुरू करण्यात आलेले आहे. जालना पुरवठा विभागासाठी २५ हजार १०४ साड्या प्राप्त झालेल्या आहेत. २०२८ या वर्षापर्यंत दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने हातमाग मंडळाशी करार केला आहे.