काळजी घ्या! पुढील २४ तास धोक्याचे, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून हाय अलर्ट जारी…

पुणे : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले होते. अनेक भागात पीक वाहून गेले, तर काही ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.

दरम्यान, आता पुन्हा भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी मोठा इशारा दिला असून, पुढील ७२ तास हवामान धोक्याचे ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात लक्षद्वीप जवळ हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे पुढील दोन दिवस कोकण, रत्नागिरी आणि गोवा परिसरात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक आणि केरळपर्यंत समांतर हवेचा पट्टा तयार होणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात आज सकाळपासूनच हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. वातावरणात बदल जाणवत असून, पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अहिल्यानगर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांचा तडाखा बसल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे.
रायगड आणि कोकणातील अनेक भागांत अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. तोंडाशी आलेले भातपिक आता पावसामुळे धोक्यात आले असून, आधीच कापणी झालेल्या शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, पिकावर उभे असलेले पाणी निचऱ्याअभावी सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राज्यात यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. मात्र, पुन्हा पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. कृषी विभागाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
