‘दृश्यम’लाही मागे टाकणारा थरार! बारामतीत पत्नीचा नवऱ्याला जिवंत गाडण्याचा कट उधळला; गुंगीचं औषध, बॅटने मारहाण अन् गॅलरीतच बांधला कट्टा


बारामती : बारामती शहरात वैवाहिक नात्यालाच काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नीने आखलेला धक्कादायक कट वेळेत उघडकीस आल्याने एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. गुंगीचे औषध देऊन पतीला बेशुद्ध करण्यापासून ते क्रिकेट बॅटने बेदम मारहाण आणि घराच्या गॅलरीत विटा-सिमेंटचा कट्टा बांधून त्याला जिवंत पुरण्याच्या प्रयत्नापर्यंतचा हा संपूर्ण प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.

ही घटना बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील फ्लॅट क्रमांक ९ मध्ये ३० जुलैच्या रात्री ते १ ऑगस्टच्या सकाळदरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी म्हणून शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८) हिचे नाव समोर आले असून, पीडित प्रवीण प्रकाश जगताप यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याचा आरोप आहे.

तपासानुसार, आरोपीने प्रथम पतीला गुंगीचे औषध दिले. ते अर्धबेशुद्ध झाल्यानंतर क्रिकेट बॅटने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यानंतर घरातील गॅलरीत विटा, सिमेंट आणि कडप्पा फरशी वापरून चौकोनी संरचना तयार करण्यात आली. जखमी अवस्थेतील प्रवीण जगताप यांना त्या कट्ट्यात ठेवून वरून फरशी बसवून सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मात्र, संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. यानंतर त्यांचे वडील प्रकाश जगताप यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमागील नेमके कारण काय, पती-पत्नीमध्ये कोणत्या कारणावरून वाद होते, तसेच या कटात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा बारामती शहर पोलीस सखोल तपास करत आहेत. घटनास्थळावरील बांधकाम साहित्य, औषधांचे नमुने आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांची न्यायवैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

चित्रपटातील कथानकाची आठवण करून देणाऱ्या या थरारक घटनेने बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घरातील सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!