बँक ग्राहकांनो लक्ष द्या! नोव्हेंबरमध्ये तब्बल १६ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार? जाणून घ्या सुट्ट्यांच्या तारखा

पुणे : ऑक्टोबर महिना संपण्यास आता काही दिवसच शिल्लक असून लवकरच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरमध्ये बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करण्याचा विचार करत असाल, तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासून घेणे गरजेचे आहे.

कारण पुढील महिन्यात दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक जयंती यांसह विविध सण आणि उत्सवांमुळे अनेक दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे लागणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सण आणि उत्सवांनुसार बँकांना सुट्ट्या असतील. मात्र, या सुट्ट्या संपूर्ण देशभर लागू नसून राज्य आणि शहरानुसार त्यामध्ये फरक असणार आहे. त्यामुळे एका राज्यातील बँका बंद असल्या तरी दुसऱ्या राज्यातील बँका सुरू असू शकतात. पेन्शन, आर्थिक व्यवहार किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी बँकेत जाणाऱ्या ग्राहकांनी याची विशेष काळजी घ्यावी.

नोव्हेंबरमध्ये कोणत्या तारखांना बँका राहणार बंद?

नोव्हेंबर २०२६ मध्ये ९, १०, ११, १३ आणि १६ नोव्हेंबर या तारखांना विविध राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्या असतील. याशिवाय २०, २३, २४ आणि २७ नोव्हेंबर रोजीही काही ठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहू शकते. या काळात दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारखे सण साजरे केले जाणार आहेत.
याशिवाय १४ नोव्हेंबर रोजी दुसरा शनिवार आणि २८ नोव्हेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना नियमित सुट्टी असेल. तसेच प्रत्येक रविवारीही बँका बंद राहणार आहेत.
नोव्हेंबर महिन्यात कोणते सण आणि उत्सव?
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सव, हरियाणा दिवस आणि पुद्दुचेरी मुक्ती दिनाने होणार आहे. यानंतर गोवर्धन पूजा, बळी प्रतिपदा, दिवाळी पाडवा, भाऊबीज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंती असे विविध सण येणार आहेत. या सणांनुसार संबंधित राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या दिल्या जाणार आहेत.
नोव्हेंबर २०२६ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
१ नोव्हेंबर (रविवार) – कन्नड राज्योत्सव, हरियाणा दिवस, पुद्दुचेरी मुक्ती दिन
८ नोव्हेंबर (रविवार) – दिवाळी, लक्ष्मीपूजन, काली पूजा
९ नोव्हेंबर (सोमवार) – गोवर्धन पूजा, विश्वकर्मा दिवस
१० नोव्हेंबर (मंगळवार) – बळी प्रतिपदा (दिवाळी पाडवा), गुजराती नववर्ष
११ नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज, भ्रातृद्वितीया
१४ नोव्हेंबर (शनिवार) – दुसरा शनिवार, वांगला महोत्सव
१५ नोव्हेंबर (रविवार) – छठ पूजा, बिरसा मुंडा जयंती
१६ नोव्हेंबर (सोमवार) – छठ पूजा (निवडक राज्ये)
२२ नोव्हेंबर (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
२३ नोव्हेंबर (सोमवार) – सेंग कुट स्नेम
२४ नोव्हेंबर (मंगळवार) – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, लाचित दिवस
२८ नोव्हेंबर (शनिवार) – चौथा शनिवार
२९ नोव्हेंबर (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
बँकेत जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा!
नोव्हेंबर महिन्यातील सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यातील बँकांना लागू होणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) राज्यनिहाय सुट्टीच्या अधिसूचनेनुसार बँकांचे कामकाज ठरवले जाते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या शहरातील बँकेच्या सुट्ट्यांची खात्री करून घ्यावी. तसेच तातडीची आर्थिक कामे सुट्ट्यांपूर्वी पूर्ण केल्यास ऐनवेळी होणारी गैरसोय टाळता येईल.
