पुणेकरांनो लक्ष द्या! भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; आता थेट २०२७ मध्येच सुरू होणार, वाहतुकीसाठी ‘हे’ पर्यायी मार्ग वापरा..

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम करणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील भिडे पूल गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसर यांना जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाचे काम भिडे पुलावर सुरू करण्यात येणार आहे. या बांधकामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी मुख्य भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला

भिडे पूल बंद असला तरी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी सुरू राहणार असल्याचे पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुठा नदीवरील भिडे पुलावर नवीन पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकात थेट आणि सुरक्षितपणे पोहोचणे सोपे होणार आहे. विशेषतः या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर
भिडे पूल बंद असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे. भिडे पुलाऐवजी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.
पादचारी पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
