दिवाळीची सवलत संपली! पुण्यात गुरुवारचा पाणीपुरवठा पुन्हा बंद राहणार? वाचा महापालिकेची अपडेट

पुणे : दिवाळीच्या काळात पुणेकरांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुरुवारची साप्ताहिक पाणीकपात तात्पुरती रद्द केली होती. मात्र, दिवाळीचा सण संपताच पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या गुरुवारी, १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आणि उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


गुरुवारची पाणीकपात पुन्हा लागू

दिवाळीनिमित्त स्थगित करण्यात आलेली गुरुवारची पाणीकपात आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे दर गुरुवारी होणारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची प्रक्रिया पूर्ववत होणार आहे. दरम्यान, पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या पर्यायावरही महापालिका स्तरावर चर्चा सुरू आहे. याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय अपेक्षित होता. मात्र, ही बैठक न झाल्याने अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

आता गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी पक्षनेत्यांची बैठक होणार असून, त्यामध्ये आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि संभाव्य पाणीकपातीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कालवा समितीच्या निर्णयानुसार पुणे शहराला मिळालेला साडेसात टीएमसी पाणीसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवायचा आहे. त्यामुळे हा पाणीकोटा वाढवून मिळावा, यासाठी लवकरच जलसंपदा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणीकोटा वाढवून मिळेपर्यंत पाणीबचतीसाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी जपून वापरण्याची गरज भासणार आहे.
