अडीच महिन्यांपूर्वीचा तो प्रकार अन् मध्यरात्री अरुणला गाठलं! आईच्या विनयभंगाचा बदला घेण्यासाठी दिनेशने आखला धक्कादायक डाव
दौंड : दोन-अडीच महिन्यांपूर्वी घडलेल्या एका कथित प्रकाराचा राग मनात कायम होता. योग्य संधी मिळताच २० वर्षीय दिनेशने साथीदाराला सोबत घेतलं आणि मध्यरात्री एकट्या अरुणला रस्त्यात गाठलं. त्यानंतर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात ३१ वर्षीय अरुण पवार याचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या सोनवडी गावाच्या हद्दीत घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तपासादरम्यान हत्येमागील कारण समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण अनिल पवार (वय ३१, रा. सोनवडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अरुण कॉर्डलाईन ते पवार पॅलेस या रस्त्यावर एकटाच फिरत होता. याच वेळी दिनेश पवार (वय २०) आणि त्याचा साथीदार रुपेश मिथून राठोड यांनी त्याला गाठले.


दोघांनी अरुणवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अरुण जागीच कोसळला. मात्र, या हल्ल्यातून त्याचा जीव वाचू शकला नाही. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

आईच्या विनयभंगाचा आरोप, मनात होता दोन-अडीच महिन्यांपासून राग!

या घटनेमागे वैयक्तिक कारण असल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपी दिनेश पवार याच्या आईचा अरुणने दोन ते अडीच महिन्यांपूर्वी विनयभंग केल्याचा आरोप आहे. या कथित प्रकारामुळे दिनेशच्या मनात अरुणविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता. हाच राग मनात ठेवून दिनेशने साथीदार रुपेश राठोड याच्यासोबत मिळून अरुणवर हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई; दोघांना अटक
या हत्येप्रकरणी सुनील पवार (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपी दिनेश पवार आणि त्याचा साथीदार रुपेश मिथून राठोड या दोघांना अटक केली आहे. दोन-अडीच महिन्यांपूर्वीच्या कथित विनयभंगाच्या घटनेतून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने सोनवडी परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.
