पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय, शासन परिपत्रक काढत दिले महत्त्वाचे आदेश


पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता सरावासाठी महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने उमेदवारांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे मैदानांच्या वापरासाठी पैसे मोजावे लागणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नगरविकास विभागाने यासंदर्भात शासन परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयानुसार, पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मैदानी चाचणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना सरावासाठी ही मैदाने उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे, वापरशुल्क, प्रवेशशुल्क किंवा अनामत रक्कम आकारता येणार नाही.

सरावासाठी वेळाही निश्चित

उमेदवारांना सराव करता यावा यासाठी पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत मैदानांचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना नियमित सराव करणे अधिक सोयीचे होणार आहे.

मैदानांवर मिळणार आवश्यक सुविधा

केवळ मैदाने उपलब्ध करून देण्यापुरताच हा निर्णय मर्यादित नसून उमेदवारांसाठी आवश्यक सुविधाही देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, बदलकक्ष, प्रकाशव्यवस्था आणि प्राथमिक उपचार सुविधांचा समावेश आहे.

राज्यात मोठ्या संख्येने तरुण पोलीस भरतीची तयारी करत आहेत. अनेक ठिकाणी सरावासाठी मैदानांचा वापर करण्यासाठी पैसे द्यावे लागत होते. मात्र, सरकारच्या या नव्या निर्णयामुळे उमेदवारांचा आर्थिक भार कमी होणार असून भरतीच्या तयारीसाठी त्यांना मोठी मदत मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!