Pune News : ‘मी IAS अधिकारी’! लोकांनी विश्वास ठेवून बनवलं चेअरमन, पण १२ वी पास तरुणाचं कारनामं समोर येताच सोसायटीत खळबळ

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरात तोतया आयएएस अधिकाऱ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या २१ वर्षीय तरुणाने आपण आयएएस अधिकारी असल्याचे भासवून सोसायटीतील नागरिकांचा विश्वास संपादन केला.
एवढेच नव्हे, तर तो सोसायटीचा चेअरमनही बनला. म्हाडाच्या लॉटरीतून सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचा आणि आर्थिक अपहार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सोसायटीचे खजिनदार दत्तराय नागरगोजे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपवर पसरवली IAS झाल्याची खोटी माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश कुलकर्णी जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बाणेरमधील संबंधित सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपली आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची खोटी माहिती दिली. त्याच्या बोलण्यावर आणि रुबाबावर विश्वास ठेवून सोसायटीच्या समितीने त्याची चेअरमनपदी निवड केली.
म्हाडाच्या लॉटरीचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा
चेअरमनपदाचा गैरवापर करत हितेशने सोसायटीतील पाच रिकाम्या सदनिका लॉटरी पद्धतीने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. शुल्क आणि मुद्रांक शुल्काच्या नावाखाली नागरिकांकडून तसेच सोसायटीच्या बँक खात्यातून तब्बल १९ लाख रुपये जमा करून घेतल्याचा आरोप आहे.
सोसायटीच्या एफडीवरही काढले कर्ज
याशिवाय सोसायटीच्या ३७ लाख रुपयांच्या मुदत ठेवीवर परस्पर १० लाख रुपयांचे कर्ज काढल्याचेही तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे एकूण ३५ लाख रुपयांच्या आर्थिक अपहाराचा आरोप हितेशवर करण्यात आला आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बाणेर पोलिसांनी कारवाई करत हितेश कुलकर्णी याला अटक केली. या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का आणि अपहाराची रक्कम कुठे वापरण्यात आली, याचा पोलीस तपास करत आहेत.
