पुणेकरांनो सावधान! आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; तुमच्या भागात पाणी कधी येणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

पुणे : यंदा मॉन्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. १५ जून उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरात आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार शहरातील विविध भागांना ठराविक वेळेतच पाणीपुरवठा केला जाणार आहे. सुधारित वेळापत्रक महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
हवामान विभागाने यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली होती. सध्या पुणे महापालिका धरणांतून दररोज सुमारे १६०० एमएलडी पाणी उचलते. मात्र, पाणीसाठा जपण्यासाठी हा पुरवठा ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

दरम्यान, भामा-आसखेड प्रकल्पातून पाणी मिळणाऱ्या उत्तर-पूर्व पुण्यातील काही भागांना तांत्रिक कारणांमुळे सध्या या कपातीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

शहरातील बोपोडी, बाणेर, पाषाण, शिवाजीनगर, एरंडवणे, औंध, बालेवाडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, वारजे, कर्वेनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे यांसह अनेक भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. काही भागांत दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. नळांची गळती तातडीने दुरुस्त करणे, टाक्या ओव्हरफ्लो होऊ न देणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १८००-१०३०-२२२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा अवाजवी दर आकारणाऱ्या खाजगी टँकरचालकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांचे लक्ष आता पुढील काही दिवसांतील पावसाकडे लागले असून, लवकरच जोरदार पाऊस होऊन पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.