प्रवाशांनो लक्ष द्या! ओला, उबर, रॅपिडोबाबत मोठा निर्णय; ‘हे’ नियम होणार लागू


पुणे : महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडो या ॲपवरून प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य परिवहन विभागाकडून ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या आणि चालकांसाठी नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. ही नवी नियमावली 1 सप्टेंबर 2026 पासून राज्यभर लागू होणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

ॲप कॅब चालकांसाठी नियम कडक

नव्या नियमांनुसार, ॲपच्या माध्यमातून प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा अधिकृत परवाना घेणं बंधनकारक असेल. तसेच चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच असणं आवश्यक राहणार आहे.

महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी चालकाला मराठी भाषेचं प्राथमिक ज्ञान असणंही अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात सेवा देणाऱ्या चालकांसाठी मराठीचं ज्ञान महत्त्वाचं ठरणार आहे.

चालकाच्या बॅचसाठी अर्ज करताना मुंबई किंवा संबंधित शहरातील 15 वर्षांचा रहिवासी दाखला आणि पोलीस पडताळणीचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. चालकाला सलग 12 तासांपेक्षा अधिक काळ वाहन चालवता येणार नाही. तसेच प्रवाशांकडून मिळणाऱ्या एकूण भाड्यापैकी किमान 80 टक्के रक्कम चालकाला मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

GPS ट्रॅकिंग आणि मराठी ॲप अनिवार्य

प्रवासी आणि चालकांच्या सुरक्षेसाठी वाहनांमध्ये GPS ट्रॅकिंग व्यवस्था असणं आवश्यक राहणार आहे. चालकांची पडताळणी आणि वाहनांच्या हालचालींवर ऑनलाइन पद्धतीने देखरेख ठेवली जाणार आहे.

ॲग्रीगेटर कंपन्यांचे मोबाइल ॲप आणि वेबसाइट तीन भाषांमध्ये उपलब्ध असणं बंधनकारक असेल. ग्राहकांना मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाना मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणात परवाना रद्द करण्यासोबतच कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांनंतर ॲप कॅबवरही नियम

काही महिन्यांपूर्वी परिवहन विभागाने राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

आता ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या ॲप-आधारित प्रवासी सेवांनाही नव्या नियमांच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून ॲप कॅब चालक आणि कंपन्यांच्या कामकाजात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!