किराणा दुकानात घुसून महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; बदलापूरमध्ये नागरिकांच्या धाडसाने टळला अनर्थ

बदलापूर : बदलापूरच्या सर्वोदयनगर परिसरात शुक्रवारी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. राहुल पांडव (वय ३५) या व्यक्तीने एका किराणा दुकानात घुसून महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि दुकानदार यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

माहितीनुसार, पीडित महिला खरेदीसाठी किराणा दुकानात आली होती. त्यावेळी दुकानदार सुट्टे पैसे आणण्यासाठी बाहेर गेला होता. याच दरम्यान आरोपी तेथे आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपीने याआधी जवळील ब्युटी पार्लरमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील तरुणीने दरवाजा बंद करून स्वतःचा बचाव केला. हा प्रकार पाहिल्यानंतर संबंधित महिला किराणा दुकानात गेली, मात्र आरोपी तिच्या मागोमाग दुकानात शिरला.
दुकानात प्रवेश करताच आरोपीने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच ब्युटी पार्लरमधील तरुणीने आरडाओरडा केला. आवाज ऐकून दुकानदार आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. आरोपीने महिलेला पकडून ठेवल्याने दुकानदाराने काठीच्या सहाय्याने त्याला दूर केले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण करत बदलापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी आरोपीविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंद न करता त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याचा आरोप केला आहे. आरोपी व्यसनाधीन असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. त्याला बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी नशामुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
