Instagram-Facebookचा तरुणांवर घातक परिणाम? Metaला तब्बल 9 हजार कोटींचा दणका; मोठी रक्कम उपचारांसाठी

अमेरिका : फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुलं आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचा ठपका ठेवत न्यू मेक्सिकोतील न्यायालयाने मेटाला तब्बल 942 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 9,030 कोटी रुपयांचा दणका दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्यसनाधीन करणारी वैशिष्ट्ये आणि मुलांच्या सुरक्षेबाबत कंपनीने पुरेशी काळजी घेतली नसल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत समोर आले.
या निर्णयातील विशेष बाब म्हणजे दंडाच्या रकमेतून मोठा निधी थेट तरुणांच्या मानसिक आरोग्य सेवांसाठी वापरला जाणार आहे. न्यायालयाने 567 दशलक्ष डॉलर्सचा स्वतंत्र निधी उभारण्याचे आदेश दिले असून, त्यातील 420 दशलक्ष डॉलर्स तरुणांच्या उपचारांसाठी खर्च केले जाणार आहेत. उर्वरित निधी जनजागृती, प्रतिबंध, तपासणी आणि इतर सहाय्यक कार्यक्रमांसाठी पुढील पाच वर्षांत वापरण्यात येणार आहे.

या प्रकरणात मेटावर यापूर्वीच 375 दशलक्ष डॉलर्सचा दिवाणी दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने आणखी 567 दशलक्ष डॉलर्सचा निधी निश्चित केला. त्यामुळे या प्रकरणातील मेटाची एकूण आर्थिक जबाबदारी 942 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. न्यू मेक्सिकोच्या ॲटर्नी जनरल राऊल टॉरेझ यांच्या नेतृत्वाखाली ही कायदेशीर लढाई सुरू झाली होती.


न्यायालयाने केवळ आर्थिक दंड ठोठावून प्रकरण संपवलेले नाही, तर फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे आदेशही दिले आहेत. अल्पवयीन वापरकर्त्यांसाठी प्लॅटफॉर्मवरील वापराच्या वेळेवर मर्यादा, रात्री आणि शाळेच्या वेळेत काही सूचना बंद करणे, अल्पवयीन मुलांच्या खात्यांवरील ‘लाईक्स’ची संख्या डीफॉल्टने लपवणे आणि वय पडताळणी अधिक प्रभावी करणे यांसारख्या उपायांचा त्यात समावेश आहे.
याशिवाय मुलांना ऑनलाइन लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या मते, मेटाच्या प्लॅटफॉर्मवरील काही रचना तरुणांना अधिक काळ जोडून ठेवण्यासाठी तयार करण्यात आल्या आणि त्यातून मानसिक आरोग्याशी संबंधित धोके वाढले. मुलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने पुरेसे इशारे आणि संरक्षणात्मक उपाय केले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
मात्र मेटाने न्यायालयाचा निर्णय मान्य केलेला नाही. कंपनीने या निर्णयाविरोधात अपील करण्याची भूमिका घेतली आहे. प्लॅटफॉर्म सुरक्षित करण्यासाठी आपण सातत्याने काम करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या निकालामुळे अमेरिकेतील इतर राज्यांमध्येही सोशल मीडिया कंपन्यांच्या जबाबदारीचा मुद्दा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाकडे अमेरिकेतील सोशल मीडिया नियमनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि ऑनलाइन सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर भविष्यात अधिक कठोर नियम लागू होऊ शकतात, अशी शक्यता या निकालामुळे निर्माण झाली आहे.