पुण्यातील आणखीन एका गुंडासह त्याच्या साथीदाराची बँक खाती गोठवली, लाखोच्या सामानाचं एकही बिल नाही….

पुणे : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईची पावले उचलली आहेत.पहिल्यांदा आंदेकर गँगचा म्होरक्या बंडू आंदेकर नंतर घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ त्यानंतर आता टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांकडून लाखो रुपयांचा मोबदला वसूल केला होता. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची बॅंक खाती गोठवली असून, अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाईही सुरू केली आहे. यावेळी आरोपींच्या घरांची झडती घेताना पोलिसांना पंखे, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, फर्निचर आदी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या. या वस्तूंची बिले मागवण्यात आली असता आरोपींच्या नातेवाइकांकडे त्याची एकही कागदपत्रे नव्हती. झडतीदरम्यान दोन नोटरीकृत साठेखत सापडले आहेत.त्यानंतर आता गुंड पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

टिपू पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाणचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

