राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? शिंदे गटाला संजय राऊतांची खुली ऑफर; मातोश्रीचे दरवाजे खुले, पण…

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका करत मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सत्तार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील नाराज नेत्यांना घरवापसीचे संकेत देत मोठे विधान केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, अब्दुल सत्तार यांचे हे वैयक्तिक मत असू शकते. कदाचित उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेल्याचा त्यांना पश्चाताप होत असावा. महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना त्यांनी काही नेते भाजपला ‘स्लो पॉयझन’ म्हणत असल्याची माहिती मिळाल्याचा दावाही केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “महायुतीत गुदमरल्यासारखे वाटत असेल आणि भाजप हे स्लो पॉयझन आहे अशी भावना निर्माण झाली असेल, तर संबंधितांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यावे.” या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नाराज नेत्यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

मात्र, काही विशिष्ट नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात येणार नाही, असे स्पष्ट संकेतही राऊत यांनी दिले. त्यामुळे ठाकरे गटाची भूमिका आणि संभाव्य राजकीय घडामोडींविषयी नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अब्दुल सत्तार यांच्या विधानांमुळे महायुतीत आधीच तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना, संजय राऊत यांच्या ‘स्लो पॉयझन’ आणि घरवापसीच्या ऑफरमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.