अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या…

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय. या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतुकीच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. अमित शहा पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरला भेट देतील.
तसेच, बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी आणि पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यांचा मुक्काम येरवड्यातील एका हॉटेलमध्ये असून, संपूर्ण दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहे. अमित शहा या दौऱ्यादरम्यान कॅडेट्स आणि सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात ४ जुलै रोजी दुपारी १२ ते संध्या ५ या वेळेत खास वाहतूक बदल करण्यात आले आहेत:
मंतरवाडी फाटा – खडीमशीन चौक ते कात्रज चौक मार्गावर सर्व जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
बंडगार्डन वाहतूक विभागातील मोर ओढा सर्किट हाऊस चौक ते आयबी चौक या मार्गावर वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वाहतूक बदलांबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.