पुणे–सोलापूर महामार्गावर अपघातानंतर चालकाला बेदम मारहाण; अज्ञात आरोपी फरार..

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एसबीआय बँकेसमोर शुक्रवारी (१७ एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी अमित हनुमंत खंडाळे (वय ३१, रा. जिरेगाव, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळे हे चालक असून, खराडी येथील समांतर फाउंडेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते खराडी येथील काम करून आपल्या हुंडाई वेन्यू क्रमांक एमएच ४२ एसेक्स ८७६४ कारने जिरेगावकडे निघाले होते.
पुणे–सोलापूर महामार्गावरून रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारांस कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एसबीआय बँकेसमोरील दुभाजकाजवळ आले त्यावेळी निळ्या रंगाच्या टाटा टियागो एमएच १२ डब्ल्यूई १५४८ मधील कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून खंडाळे यांच्या कारच्या ड्रायव्हर साईडला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या कारच्या दरवाजाचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर खंडाळे यांनी तात्काळ आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. परंतु, समोरील वाहन चालक आणि त्याच्यासोबत असलेला अज्ञात इसमाने खंडाळे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि दोघांनीही हाताने बेदम मारहाण केली.

या घटनेदरम्यान खंडाळे यांनी पोलीस आपत्कालीन नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथे फोन करून माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्याचे लक्षात येताच दोघांनी तात्काळ पळ काढला. यानंतर खंडाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सक्रिय केले आहे. पुढील तपास सुरू आहे.