अक्षय्य तृतीयेला सोनं-चांदी आऊट ऑफ कंट्रोल; आजचे दर पाहून खरेदीदारांचा उडणार तोल…

पुणे : अक्षय्य तृतीयेचा सण हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि तो अत्यंत शुभ मानला जातो. राज्यभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘अक्षय्य’ म्हणजे कधीही न संपणारे—म्हणून या दिवशी केलेली खरेदी किंवा गुंतवणूक आयुष्यभर समृद्धी देणारी मानली जाते.

याच श्रद्धेमुळे अनेकजण या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याला विशेष प्राधान्य देतात. परिणामी, आज सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळलेली दिसत आहे. दरम्यान, जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम म्हणून यंदा सोने-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. आजही या मौल्यवान धातूंच्या किंमतींनी अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली असून खरेदीदारांच्या खिशावर ताण वाढला आहे.
यंदाच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला असून ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह तब्बल १.५७ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे, तर चांदीच्याही किमतींमध्ये ऐतिहासिक वाढ नोंदवली जात आहे. परंपरेनुसार खरेदीचा उत्साह कायम असला तरी यंदा महागाईमुळे ग्राहकांच्या खिशावर ताण वाढणार आहे.

केवळ सोन्याच नव्हे, तर चांदीच्या दरातही यंदा जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. जीएसटीसह चांदीचा दर सुमारे २.६७ लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने-चांदीच्या किमतींवर थेट परिणाम झाल्याचे जाणकारांचे मत आहे. परिणामी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांना यंदा अधिक खर्च करावा लागत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची दरवाढ सामान्य ग्राहकांच्या बजेटला धक्का देणारी ठरत आहे. सोन्याच्या किमतीत तब्बल ५७ हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीने तर सर्व विक्रम मोडत सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांनी झेप घेतली आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही वाढ केवळ देशांतर्गत मागणीमुळे नसून जागतिक घडामोडींमुळे अधिक तीव्र झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, मध्यपूर्वेतील वाढता तणाव, तसेच आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणांमधील बदल यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळले आहेत. याशिवाय जागतिक व्याजदरातील चढ-उतार आणि व्यापार धोरणांमुळेही सोन्याच्या दरात अनपेक्षित उसळी दिसून येत आहे.
दरवाढ मोठी असली तरी ग्राहकांचा खरेदीचा उत्साह कायम आहे. हॉलमार्क असलेल्या दागिन्यांना प्राधान्य दिले जात असून, मोठे दागिने घेणे शक्य नसल्यास अनेकजण सोन्याऐवजी चांदीची नाणी किंवा लहान वस्तू खरेदी करून अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधताना दिसत आहेत.