पुण्यात धक्कादायक घटना! भिडे पुलाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; परिसरात खळबळ..

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच आता पुण्यातील प्रसिद्ध अशा भिडे पुलाजवळ एक मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या भिडे पुलाजवळ आज एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, या तरुणाची हत्या दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असून, हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी परिसरातील पंचनामा सुरू केला असून फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची घटना समोर आली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम सध्या सुरू आहे.