सावधान! महाराष्ट्रात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार; राज्यभर जोरदार बरसणार; ‘या’ तारखा लक्षात ठेवा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आता राज्यातील हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, 13 ते 20 ऑगस्टदरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 20 ते 27 ऑगस्टदरम्यानही राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण-पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेश परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील 24 तासांत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.


या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील पावसाच्या हालचालींवर होण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुन्हा मान्सून सक्रिय होऊ शकतो.
महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस
दरम्यान, महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासांत येथे 82.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल 5,016 मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती आहे.
देशातील ‘या’ राज्यांनाही पावसाचा इशारा
महाराष्ट्रासोबतच देशातील अनेक राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ओडिशाच्या काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
याशिवाय मध्य महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.