Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा अॅक्शन मोडमध्ये; भाकरी फिरवणार, घेणार मोठा निर्णय…

Ajit Pawar : विधानसभा निवडणूक निकालानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएमवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच येत्या काळात भाकरी फिरवण्याचे संकेत देखील दिले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गट दिल्लीची विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता नवा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत आज दिल्लीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार , प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये देखील एक बैठक झाली आहे.
‘आपल्या पार्टीचा देशभरात कसा विकास होईल, आपण अधिकाधिक जागा कशा जिंकू? महिलांना कशापद्धतीनं जास्तीत जास्त संधी देता येईल या सर्व विषयावर आम्ही चर्चा केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. Ajit Pawar
पुढे बोलताना ते म्हणाले की, डिसेंबरनंतर पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन देखील घेऊ. त्यामध्ये पक्षाला कसं पुढं न्यायचं, पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्ष व्हायचं आहे, त्यासाठी काय करावं लागणार? यावर चर्चा होईल.
तसेच जे चांगलं काम करत आहेत त्यांना आणखी जास्तीत जास्त संधी देण्यात येईल, जी पक्षासाठी कामं करणारी जुनी लोक आहेत, त्यांची जबाबदारी तरुणांकडे सोपवण्यात येईल, ज्यामुळे पक्षात तरुणांची फळी निर्माण होईल. महिलांना देखील संधी देण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत.