पुणे जिल्ह्यात मिठाई विक्रेत्यांवर कारवाई ; १ कोटी 57 लाखांचीं भेसळयुक्त मिठाई जप्त..

पुणे : ऐन दिवाळीच्या सणासुदीत पुणे जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यावर कडक कारवाईला सुरुवात झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने तपास मोहिमेदरम्यान भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे एक कोटी 97 लाख 93 हजार 42 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने 11 ऑक्टोबरपासून विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान एकूण 353 ठिकाणी तपासणी करण्यात आली असून 196 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.खवा, पनीर, मावा, गाईचे तूप, बटर आणि वनस्पती तूप यांसारख्या अन्नपदार्थांचे 654 नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या 216 नमुन्यांपैकी 190 प्रमाणित दर्जाचे, तर 5 कमी दर्जाचे, 8 मध्ये लेबलदोष आणि 13 नमुने असुरक्षित आढळले आहेत. संबंधित नमुन्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान या मोहिमेदरम्यान पुणे विभागीय कार्यालयाने तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, भगर आणि इतर अन्नपदार्थांचा एक कोटी 97 लाख 93
हजार 42 रुपयांचा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.ही संपूर्ण कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (पुणे विभाग) तसेच अन्न आणि औषध प्रशासन, राज्य पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

सणासुदीच्या काळात विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, अशा तक्रारींसाठी अन्न आणि औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा.
