१५ ऑगस्टनंतर मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई? राज्यभरात आरटीओची धडक मोहीम; परवान्यांवर टांगती तलवार

मुंबई : “रिक्षा चालवायची असेल तर मराठी यायलाच हवी!” राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर आता परिवहन विभागाने प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येते का, याची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) विशेष मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर थांबवून चालकांची चौकशी केली जात असून, मराठीत संवाद साधून त्यांची भाषा समज आणि बोलण्याची क्षमता तपासली जात आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता की, मराठी भाषा लिहिता आणि वाचता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. सुरुवातीला एक मेपासून कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र, चालकांना मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला. आता प्रशासनाने १५ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत निश्चित केली असून, त्यानंतर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
सध्या सुरू असलेल्या मोहिमेत आरटीओ अधिकारी रिक्षा आणि टॅक्सी थांबवून चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाने आणि इतर कागदपत्रांची तपासणी करत आहेत. याचवेळी चालकांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांना भाषा समजते का, हे पाहिले जात आहे. केवळ कागदपत्र तपासणीपुरती ही मोहीम मर्यादित नसून, चालक आणि वाहनमालकांची स्वतंत्र नोंदणीही केली जात आहे.

परिवहन विभागाच्या मते, अनेकदा प्रवासी आणि चालकांमध्ये भाषेच्या अडचणीमुळे वाद निर्माण होतात. स्थानिक भाषेचे ज्ञान हा परवाना देताना असलेला महत्त्वाचा नियम असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांशी सुसंवाद वाढावा आणि गैरसमज टाळले जावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, १५ ऑगस्टनंतर मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परवाना निलंबन किंवा रद्द करण्यासारखी पावले उचलली जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे विशेषतः परप्रांतीय चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आता मराठी शिकण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.
राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा ‘मराठी विरुद्ध अमराठी’ हा मुद्दा चर्चेत आला असून, आगामी काळात या मोहिमेचे परिणाम काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.