ऐन दिवाळीत भाविकांचा भीषण अपघात! चांदशैली घाटात मृतांचा खच, ६ भाविकांचा जागीच मृत्यू..

नंदूरबार : ऐन दिवाळी सणाच्या काळात नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर काहींना पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची सोय करण्यात आली आहे. या अपघातीतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, येथील चांदशैली घाटात पिकअप गाडी उलटून हा अपघात झाला. या गाडीतील लोक अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. ही यात्रा संपवून माघारी परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला. चांदशैली घाटातून पिकअप गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला.

मिळालेल्या माहिती, आतापर्यंत या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.
पिकअप व्हॅन घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. त्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले. अनेकांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस बचाकार्यासाठी घटनास्थळी आले तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
