डॉ. आंबेडकर जयंतीचे फ्लेक्स फाडणार्या एका समाजकंटकास वेल्हे पोलिसांकडून अटक

वेल्हे : येथील विंझर गावातील कमानीसमोर काही युवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे फ्लेक्स लावत होते. त्या वेळी समाजकंटक राजू भोसले हा मोटारसायकलने तेथे आला. त्या वेळी त्याने, ‘तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फ्लेक्स लावू नका. फ्लेक्स लावल्यावर बघा काय करतो ते मी, तो फाडून टाकणार’, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली.
तसेच नंतर सिध्दार्थ प्रतिष्ठान व विविध संघटनांच्या वतीने लावलेले दोन्ही फ्लेक्स फाडले. फ्लेक्स फाडल्याच्या घटनेनंतर विंझर गावासह राजगड तोरणा भागात या प्रकारामुळे तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी तातडीने सखोल तपास करून समाजकंटकाला गजाआड केल्याने आता तणाव कमी झाला आहे.
गावात कायदा व शांतता राखण्यासाठी वेल्हे पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. राजू बबन भोसले (वय 27, रा. भुरुकवाडी, विंझर) असे अटक करण्यात आलेल्या समाजकंटकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात याआधीही गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी भारतीय बौद्ध महासभेचे उल्हास गायकवाड यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकारामुळे गावात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह विविध संघटना व नागरिकांनी आंदोलन सुरू केले. त्यामुळे वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपास सुरू केला. गावातील हर्षद कारके याच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
यामध्ये राजू भोसले हा ब्लेडने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले दोन्ही फ्लेक्स फाडत असल्याचे दिसले. रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी याबाबत तपास करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.