महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण, आग्र्यात छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभं राहणार, शासन आदेश जारी…

मुंबई : मीना बाजार परिसरातील राजा रामसिंग यांची कोठी आहे. या कोठीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सवात केली होती.
आग्र्यातील मीना बाजार परिसरात राजा रामसिग यांची कोठी आहे. याच कोठीत औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले होते, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनीही शिवजयंतीच्य कार्यक्रमात बोलताना तसा उल्लेख केला होता. मीना बाजारात असलेली राजा रामसिंगची कोठी मुघल राजवटीनंतरच्या काळात ब्रिटिशांच्या ताब्यात होती.
तेव्हा काही काळ उत्तर पश्चिम प्रांताच्या गव्हर्नरांचे अधिकृत निवासस्थान होते. गव्हर्नरांकडे येणाऱ्या पाहुण्यांचा मुक्काम देखील याच कोठीमध्ये असायचा. कालांतराने १८५७ मध्ये या कोठीचा लिलाव झाला आणि ही कोठी राजा जयकिशनदास यांनी खरेदी केली होती. आजही ही कोठी ब्रिटिशांनी राजा जयकिशनदासला लिलावात दिल्याचा उल्लेख असलेली एक पाटी कोठीसमोर पाहायला मिळते.
तसेच ‘राजा जयकिशनदास भवन’ असे नाव या कोठीच्या द्वारावर लिहिले आहे. सध्या राजा जयकिशनदास यांचेही कुणी वारसदार या कोठीमध्ये राहत नाहीत. मात्र त्या कोठीची देखभाल करण्यासाठी एक-दोन कुटुंब आजूबाजूला आहेत. आता याच कोठीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होणार आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने देखील त्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे देशभरातील शिवप्रेमींमध्ये मोठा आनंद आहे.