दादांना मुखाग्नी देण्याआधीच ‘सत्तेचा’ डाव? आमदारांना फोन, शपथविधीची तयारी; उमेश पाटलांच्या गौप्यस्फोटाने राष्ट्रवादीत खळबळ!

पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींना आता आणखी एक धक्कादायक वळण मिळालं आहे. पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेल्या एका गंभीर दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीपूर्वीच काही जणांनी सत्तेतील पुढील समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली होती, एवढंच नव्हे तर काही आमदारांना फोन करून राजकीय हालचाली केल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही काळातच पक्षातील नेतृत्व आणि पुढील राजकीय वाटचालीवर चर्चा सुरू झाल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं. “दादांना मृताग्नी देण्याआधी काही लोकांनी शपथविधीची तयारी चालू केली होती. हा मंत्री होणार, तो केंद्रात जाणार, अशा चर्चा सुरू होत्या,” असा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा प्रसंग आलेला असताना काही जण राजकीय आडाखे बांधत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

या कथित हालचालींबाबत उमेश पाटील यांनी थेट आमदारांना करण्यात आलेल्या फोनचा मुद्दा उपस्थित केला आहे. “दादांच्या अपघातानंतर आणि अंत्यविधी होण्याच्या दरम्यान कोणाकोणाला फोन गेले, कशासाठी गेले आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घ्या,” असं आवाहन त्यांनी केलं. मात्र या दाव्यांमध्ये त्यांनी कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही.


दरम्यान, उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर ती नेमकी कोणाला उद्देशून आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र ही पोस्ट एखाद्या एका व्यक्तीला लक्ष्य करून केलेली नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या मोठ्या जनतेने अजित पवार यांच्या निधनावेळी दाखवलेला जनसमर्थनाचा आविष्कार त्यांनी अधोरेखित केला. अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते आणि त्यातून त्यांचं जनतेशी असलेलं नातं स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्यावर पक्ष आणि सरकारशी संबंधित मोठ्या जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी राजकीय हेतूने कुटुंबाला लक्ष्य करणं योग्य नसल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलं.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या नेतृत्वाबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेलाही या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज व्यक्त केली आहे, तर प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर पक्षातील अंतर्गत चर्चांना आणखी वेग आला आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्षातील भूमिकेवरून सुनील तटकरे यांनीही वेगळी भूमिका मांडल्याचं ताज्या वृत्तांत समोर आलं आहे.
दरम्यान, रुपाली पाटील यांनी उमेश पाटील नाव घेण्यास घाबरत असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील यांनी आपण कोणालाही घाबरत नसल्याचं स्पष्ट केलं. “उमेश पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही. उमेश पाटील अजितदादांचा कार्यकर्ता आहे. दादा जसे निडर होते, तसाच उमेश पाटील आहे,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय हालचाली झाल्या, कोणत्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत पडद्यामागे कोणते निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला, यावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. उमेश पाटील यांनी केलेल्या दाव्यांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला असून, त्यांच्या आरोपांवर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.