टीव्ही पाहत बसलेल्या चिमुकलीला गोड बोलून नेलं; उसाच्या शेतात नराधमाचा सैतानी खेळ, जुन्नरच्या पिंपळवंडीत संतापाचा महापूर

पिंपळवंडी : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. घरासमोर इतर मुलांसोबत टीव्ही पाहत आणि खेळत असलेल्या अवघ्या साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीला शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने गोड बोलून घराबाहेर नेले आणि काही वेळातच तिचे आयुष्य संपवले. पिंपळवंडी गावातील या घटनेमुळे संतापाची तीव्र लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मंगळवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित मुलगी घराजवळील परिसरात इतर मुलांसोबत वेळ घालवत होती. त्याच वेळी घराशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने तिच्याशी ओळखीचा फायदा घेत तिला बाहेर बोलावले. त्यानंतर सायकलवरून गावाबाहेरील उसाच्या शेतात नेल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शेतात नेल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान संशयिताच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.


घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली असून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष म्हणजे ही घटना जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावात घडल्याने परिसरात आणखी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनावर दबाव आणत जलदगतीने तपास पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यभरातून या घटनेचा निषेध होत असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त होत आहे.