तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली विकला जाणारा 650 किलो निकृष्ट पेढा केला नष्ट

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या पेढा व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. साई मंदिर परिसरातील खासगी पेढा विक्री केंद्रे आणि उत्पादन आस्थापनांवर टाकलेल्या धाडीत 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करून नष्ट करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
आयुक्तांच्या निर्देशानंतर अहिल्यानगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शिर्डीत धडक तपासणी मोहीम राबवली. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असून प्रसाद विक्री केंद्रे आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

दिवसभर चाललेल्या या मोहिमेत तब्बल 650 किलोहून अधिक वजनाचा निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला. कायदेशीर प्रक्रियेनुसार हा पेढा नष्ट करण्यात आला असून त्याची अंदाजे बाजार किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शिर्डी परिसरातील निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भाविकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला असून आगामी काळातही अशा धाडसत्रांना अधिक वेग दिला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.