खाकीतून घडले माणुसकीचे दर्शन ; लोणी काळभोर पोलिसांकडून थेऊर पूरग्रस्तांसाठी दिवाळी शिधावाटप …..

उरुळी कांचन : प्रशासनात काम करताना, गोरगरीब व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. काम करीत असताना कधी कधी चढउताराचा सामनादेखील करावा लागत असतो. परंतु, या समाजात काम करीत असताना, समाजासाठीही आपण काही तरी देणे लागतो. या भावनेतून आपणही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. अशी सामाजिक बांधिलकी जपत आपण त्यांची दिवाळी गोड केली पाहिजे. असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रुके वस्ती येथील 28 पूरग्रस्त कुटुंबांना लोणी काळभोर पोलिसांकडून दिवाळीचा शिधा व मिठाई शनिवारी (ता.18) वाटप करण्यात आला. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन राजेंद्र पन्हाळे यांनी केले. यावेळी प्रिंट व डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार, विजय जाधव, रवी आहेर, संदीप जोगदंड, महेश चव्हाण, मंगेश नानापुरे, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, बापू वाघमोडे, थेऊरच्या पोलीस पाटील रेश्मा कांबळे, कुमार जोगदंड व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेंद्र पन्हाळे म्हणाले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या अगोदरच एक दिवसाचे वेतन सर्व पोलीस बांधवांनी दिलेले आहे. शासनाने शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. परंतु, अजूनही काही कुटुंबांचे संसार उघड्यावरच आहेत. आपल्याही रुके वस्ती येथील नागरिकांनासुद्धा पुराचा मोठा फटका बसला असून अजूनही त्यांचे जनजीवन विस्कळीत आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पूरग्रस्तांना मदत केली आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात थेऊर येथे ढग फुटी सदृश्य पाऊस पडला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. आपत्तीग्रस्त नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वखुशीने वर्गणी गोळा केली. या जमा झालेल्या रकमेतून शिधा व मिठाई खरेदी करण्यात आली. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्याचे पूरग्रस्तांना वाटप करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
