शेतकरी कर्जमाफीला मुहूर्त मिळाला! ‘या’ दिवशी खात्यात येणार कर्जमाफीचे पैसे, जाणून घ्या

पुणे : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच तांत्रिक अडचणीमुळे पैसे खात्यात जमा होण्यास विलंब झाला. मात्र, आता ही अडचण दूर करण्याचे काम सुरू असून येत्या दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
यापूर्वी 4 ऑगस्टपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्याला विलंब झाला. आता शनिवारी किंवा रविवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात कमी रकमेची कर्जे असलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून त्यानंतर मोठ्या कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.


दरम्यान, कर्जमाफीसाठी ई-केवायसी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 12 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 17 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीत नाव आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. पहिल्या यादीत नाव न आल्यास शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
दरम्यान, 96 हजार करदाते शेतकरी आणि इतर अपात्र ठरलेल्या जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही.
खत विक्रेत्यांवरही कारवाईचा इशारा
युरियासोबत विनाअनुदानित खते घेण्याची सक्ती काही ठिकाणी शेतकऱ्यांवर केली जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन परिपत्रक काढण्यात आले असून, शेतकऱ्यांना सक्ती करणाऱ्या खत विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.