फायनान्सवाले ठरले काळ! इंदापूर तालुक्यातील पती- पत्नीची आत्महत्या; फायनान्स कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल…


इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथे मागील महिन्यात तीन दिवसांमध्ये लागोपाठ पत्नी व पतीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेने लुमेवाडी हादरून गेले होते.

ही घटना म्हणजे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेला त्रास, ओढून नेलेली गाडी आणि त्यामुळे समाजात बिघडलेली पत याच कारणामुळे झाली असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच, पोलिसांनी टाटा फायनान्स कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुलभा संतोष माने (वय ४० वर्ष) आणि संतोष महादेव माने (वय ४५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या पत्नी व पतीचे नाव आहे.

याप्रकणी वसंत आप्पा माने यांनी १५ जुलै रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भादवि कलम ३०६ अंतर्गत बाळासाहेब पाटोळे व फायनान्स कंपनीच्या इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, संतोष माने यांनी टाटा जेस्ट एमएच ४२ ए क्यू 99 45 ही चार चाकी गाडी टाटा मोटर्स फायनान्स कडून हप्त्याने घेतली होती. मात्र हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीच्या या कर्मचाऱ्यांनी २६ जून रोजी ही चारचाकी गाडी ओढून नेली.

या दरम्यान सुलभा माने यांना फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून शिवीगाळ केली होती. त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या सुलभा माने यांनी २६ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुलभा माने यांच्या आत्महत्येला तिसरा दिवसही उजाडत नाही, तोच त्यांच्या पतीने देखील नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन २८ जून रोजी राहत्या घरीच आत्महत्या केली.

दरम्यान संतोष माने यांची आत्महत्या म्हणजे फायनान्स कर्मचाऱ्यांनी घडवून आणलेल्या प्रकारामुळे झाली असल्याचा आरोप फिर्यादी वसंता आप्पा माने यांनी केला.

संतोष माने आपल्याशी बोलले होते त्यांनी बाजारातली आपली पत गेली, परिसरात माझी अब्रू गेली, पत्नीही गेली, हे सगळं फायनान्स कंपनीमुळे घडलं असे नैराश्यातून म्हटले होते असे वसंत माने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार असून, या घटनेच्या अन्य बाजू, एकूण पार्श्वभूमी, सत्य आणि तथ्य आपण तपासत असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!