पुणेकरांनो, पीएमपी बसने प्रवास करताना सावधान! गर्दीचा फायदा घेत भामट्याने ज्येष्ठ नागरिकाला गाठलं, २ लाखांची सोनसाखळी लंपास..


पुणे : कामानिमित्त बाहेर पडताना पुणेकर मोठ्या प्रमाणात पीएमपी बसचा वापर करतात. मात्र, बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांना लक्ष्य करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशीच एक घटना विमाननगर ते वाघोलीदरम्यान प्रवास करणाऱ्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकासोबत घडली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तब्बल २ लाख रुपये किमतीची सोनसाखळी लांबवली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील उबाळेनगर परिसरात राहतात. मंगळवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ते विमाननगर येथून वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये चढले. सायंकाळची वेळ असल्याने बसमध्ये मोठी गर्दी होती.

बस गर्दीतून पुढे जात असताना अज्ञात चोरट्याने धक्काबुक्कीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी अतिशय चलाखीने काढून घेतली. काही वेळाने ज्येष्ठ नागरिकांनी गळ्याला हात लावल्यानंतर सोनसाखळी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बसमध्ये तसेच आजूबाजूला शोध घेतला, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.

सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने विमानतळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील तसेच संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी तसेच दागिने चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांनी गर्दीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू, दागिने आणि पाकीट सुरक्षित ठेवण्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!