अंदमानमध्ये लोणीच्या चिमुकल्या नृत्यांगनांची सुवर्णभरारी, भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम; लिशाला प्रतिष्ठेचा ग्लोबल अवॉर्ड


लोणी काळभोर, ता. २१ : जिद्द, मेहनत, सातत्यपूर्ण कलासाधना आणि गुरूंचे मार्गदर्शन यांच्या जोरावर लोणी काळभोरच्या दोन चिमुकल्या नृत्यांगनांनी थेट अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि रिपल पार्टनर युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या ओलंपियाड स्पर्धेत भरतनाट्यम नृत्यप्रकारात लिशा जगदीश कलाल आणि कायरा गोयल यांनी आपापल्या वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे, लिशा कलाल हिच्या उल्लेखनीय कलासादरीकरणाची दखल घेत तिला प्रतिष्ठेच्या ग्लोबल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या यशामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पोर्ट ब्लेअर येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या सांस्कृतिक स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध वयोगटांत आणि कलाप्रकारांत झालेल्या या स्पर्धेत भरतनाट्यम नृत्यप्रकारात दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या सादरीकरणातून परीक्षकांची विशेष दाद मिळविली. ताल, लय, पदन्यास, मुद्राभिनय आणि भावाभिव्यक्ती यांचा सुरेख संगम साधत त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचे प्रभावी दर्शन घडविले. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि दोघींनीही प्रथम क्रमांकावर नाव कोरले.

लिशा कलाल ही नेहा अकॅडमीची विद्यार्थिनी असून, कायरा गोयल ही एमआयटी शाळेत शिक्षण घेत आहे. कमी वयातच नृत्यकलेची आवड जोपासत दोघींनी सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. त्यातच लिशाला मिळालेला ग्लोबल अवॉर्ड तिच्या कलाप्रवासातील विशेष उपलब्धी ठरली आहे.

दोन्ही विद्यार्थिनींना प्रसिद्ध नृत्यगुरू नेहा भांडवलकर यांचे मार्गदर्शन लाभले. शास्त्रीय नृत्याची शिस्त, नृत्यातील बारकावे, भावाभिव्यक्ती आणि रंगमंचावरील आत्मविश्वास यासाठी त्यांनी विद्यार्थिनींकडून कसून तयारी करून घेतली.

पाश्चात्त्य कलाप्रकारांचे आकर्षण वाढत असताना या चिमुकल्या नृत्यांगनांनी भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा वारसा जपत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर आपली चमक दाखविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, नातेवाईक आणि लोणी काळभोर पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे परिसरातील नवोदित कलाकारांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!