रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! लग्नाची वरात असो वा तीर्थयात्रा, एका नियमामुळे हजारो प्रवाशांचा त्रास संपणार; अर्ज कुठे करायचा?

मुंबई : रेल्वेने मोठ्या समूहासोबत प्रवास करण्याचा विचार करत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लग्नसमारंभ, तीर्थयात्रा, शैक्षणिक सहली किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी अनेक जणांना एकाच वेळी रेल्वेचे आरक्षण करायचे असेल, तर त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचा बदल केला आहे. समूह आणि मोठ्या प्रमाणावरील तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांचे एकत्रित बुकिंग करणे अधिक सोयीचे होणार आहे.
एका नियमामुळे मोठ्या समूहांना दिलासा

आतापर्यंत समूह आरक्षण करताना एकाच वेळी आरक्षित करता येणाऱ्या बर्थच्या संख्येवर निश्चित कमाल मर्यादा होती. त्यामुळे मोठ्या समूहाला प्रवास करायचा असल्यास आरक्षण करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ही निश्चित मर्यादा हटवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यास आवश्यकतेनुसार मोठ्या समूहासाठी तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. अर्थात, अर्जाची पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल.

कोणत्या प्रवाशांना मिळणार फायदा?

या बदलाचा सर्वाधिक फायदा एकत्र प्रवास करणाऱ्या समूहांना होणार आहे. लग्नसमारंभासाठी जाणारे वऱ्हाडी, तीर्थयात्रेसाठी निघालेले भाविक, शाळा-महाविद्यालयांच्या सहलीतील विद्यार्थी, क्रीडा स्पर्धांसाठी जाणारे संघ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे कलाकार यांना समूह आरक्षणाचा लाभ घेता येईल.
रेल्वेने केलेले पाच महत्त्वाचे बदल
१. समूह आरक्षणातील बर्थच्या संख्येची निश्चित कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे.
२. मोठ्या समूहांसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मंजुरीने एकत्रित आरक्षण करता येणार आहे.
३. मुख्य आरक्षण पर्यवेक्षक आणि स्थानक व्यवस्थापक यांना नियमानुसार समूह बुकिंग मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
४. विविध प्रवासी श्रेणींसोबत आरएसी आणि प्रतीक्षा यादीतील तिकिटांचाही या सुविधेत समावेश करण्यात आला आहे.
५. प्रवासाचा उद्देश आणि प्रवाशांची माहिती तपासल्यानंतरच अर्जाला मंजुरी दिली जाणार आहे.
तिकीट बुक करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?
समूह आरक्षणासाठी प्रवाशांना प्रमुख आरक्षण केंद्रांवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल. सकाळी ९ वाजल्यापासून हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विशेष म्हणजे, अर्ज थेट संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडेच द्यावा लागेल. एजंट किंवा मध्यस्थांमार्फत केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जामध्ये प्रवासाचा उद्देश, समूहातील प्रवाशांची संख्या आणि सर्व प्रवाशांची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असेल. परतीच्या प्रवासासाठी आरक्षण हवे असल्यास त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. तसेच या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जाच्या प्रत्येक पानावर संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि अधिकृत शिक्का असणार आहे.
त्यामुळे आता मोठ्या समूहाने रेल्वे प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना आरक्षणासाठी अधिकृत प्रक्रिया उपलब्ध होणार आहे. मात्र, तिकीट मिळणे हे उपलब्धता, पडताळणी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मंजुरीवर अवलंबून असेल.
