हिंगोलीच्या राजकारणाला मोठा धक्का! राज्यसभेतील धनगर समाजाचा आवाज हरपला; खासदार रामराव वडकुते यांचे निधन

हिंगोली : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हिंगोलीचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
रामराव वडकुते यांची ओळख धनगर समाजाचे नेतृत्व करणारे आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेले राजकीय नेते म्हणून होती. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत राज्यसभेवर संधी दिली होती. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेळी-मेंढी महासंघापासून राज्यसभेपर्यंतचा प्रवास

रामराव वडकुते यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी शेळी-मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

२०१९ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश
ऑक्टोबर २०१९ मध्ये रामराव वडकुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवली. २०२१ मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याशिवाय हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
धनगर समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी
धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून रामराव वडकुते यांची राज्यात ओळख निर्माण झाली होती. समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनेही त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जात होते. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवून मोठी जबाबदारी दिली होती.
मात्र, राज्यसभेतील त्यांचा प्रवास सुरू असतानाच काळाने घाला घातला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच समर्थक, कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. हिंगोली जिल्ह्याने आपला एक महत्त्वाचा राजकीय चेहरा गमावला आहे.
