नानांच्या निधनानंतर ‘त्या’ फोनने वाढवलं गूढ; रोहित पवारांचा दावा वेगळा, शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली धक्कादायक इनसाइड स्टोरी

पुणे : नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या सामाजिक भूमिकेपासून राजकीय संबंधांपर्यंत अनेक आठवणी चर्चेत येत असतानाच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नानांनी या आंदोलनाबाबत नेमकी कायभूमिका घेतली होती, यावरून आता दोन वेगवेगळे दावे समोर आले आहेत. आमदार रोहित पवार यांनी नानांशी झालेल्या संवादाचा दाखला देत त्यांची भूमिका विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचं सांगितलं, तर शिंदे गटाचे नेते संतोष पाटील यांनी याच्या अगदी वेगळा दावा केला आहे.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण तीन दिवसांपूर्वी नाना पाटेकरांना फोन केला होता, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. एका मित्राच्या माध्यमातून नानांना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर नानांनी, ‘तुला सांगायची गरज नाही. हे सर्व विद्यार्थी आपलेच आहेत,’ असं म्हटल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

रोहित पवारांनी हा किस्सा विद्यार्थ्यांसमोर सांगितल्यानंतर नानांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाचे नेते संतोष पाटील यांच्या फेसबुक पोस्टमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.


संतोष पाटील यांनी नानांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे नाना पाटेकर व्यथित झाले होते आणि या विषयावर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार होते, असा दावा त्यांनी केला.
पाटील यांच्या पोस्टनुसार, आंदोलनाला भेट देण्याबाबत रोहित पवारांचा फोन नानांना आला होता. मात्र, नानांनी ‘या विषयाबाबत आपण मोठ्या पवार साहेबांशी बोलणार असून, रोहित पवारांना समज द्यावी,’ असं म्हटलं होतं, असा दावा पाटील यांनी केला. एखादं प्रकरण किती ताणावं, याचाही विचार झाला पाहिजे, अशी नानांची भूमिका असल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.
त्यामुळे नानांच्या निधनानंतर त्यांच्या एका फोनकॉलभोवतीच आता दोन वेगवेगळ्या कहाण्या समोर आल्या आहेत. रोहित पवारांचा दावा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नानांचा पाठिंबा असल्याचा आहे, तर संतोष पाटील यांच्या म्हणण्यानुसार नाना आंदोलनाच्या पद्धतीबाबत नाराज होते आणि शरद पवारांशी चर्चा करणार होते.
नाना पाटेकरांचे सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या भूमिकेचा दाखला देत सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, दोन्ही बाजूंकडून दावे करण्यात आले असले तरी नानांनी नेमकी कोणती भूमिका घेतली होती, याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.
