लोणावळा, हायफाय पार्ट्या अन् मध्यरात्री पोलिसांचा सापळा; तरुणाची झडती घेताच समोर आलं धक्कादायक सत्य…

लोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरात उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये विक्रीसाठी आणलेले तब्बल ७४ लाख रुपये किमतीचे कोकेन अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केले आहे. या कारवाईत पनवेल येथील एका अमली पदार्थ तस्कराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
खंडाळा परिसरात एक इसम महागड्या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री ते बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडाळा गावच्या हद्दीतील केरावाला सोसायटी ते रेल्वे गेट क्रमांक ३० दरम्यान सापळा रचला.

यावेळी संशयित सोनू सीताराम उपाध्याय (वय २८, रा. डेरिवली, पनवेल, जि. रायगड) हा त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १४८ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ७४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलीस अंमलदार संतोष कांतिलाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून कोकेनसह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
हे कोकेन नेमके कोणाकडून आणण्यात आले होते आणि लोणावळा-खंडाळा परिसरातील कोणत्या उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये त्याची विक्री होणार होती, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
