पारधी समाजाच्या अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला; दौंड पोलीस ठाण्यात दोघांवर ॲट्रॉसिटी..

दौंड : दौंड तालुक्यातील लिंगाळी येथील पारधी समाजाच्या एका अल्पवयीन मुलाला रस्त्यात अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना रविवारी (ता.१६) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मळद येथील दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत रवि चव्हाण (वय १५) असे हल्ला करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर, कैलास धोत्रे व ज्ञानदेव विटकर (पुर्ण नाव माहीत नाही रा. मळद ता. दौंड जि.पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रोहीत चव्हाण हा कटिंग करुन भाजीपाला घेऊन लिंगाळी चौकामधुन पायी चालत घरी जात असताना कैलास व ज्ञानदेव हे दोघे दुचाकीवरुन आले. त्यांनी कारण नसताना रोहीत याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली.
ज्ञानदेव विटकर याने कमरेचा चाकू काढून डोक्यात मारला. डोक्यातुन रक्त आल्याने रोहीत याने जोरात ओरडल्याने ते दोघे मोटार सायकल वरुन तेथुन निघुन गेले. रोहित जखमी अवस्थेत घरी आला व त्याने हा संपूर्ण प्रकार त्याच्या आई-वडिलांना सांगितलं.
त्यानंतर त्याला जखमी पाहून त्याला घेऊन त्याच अवस्थेत आई-वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीसांनी रोहीत यास औषध उपचारकामी मेडीकल यादी दिल्याने औषध उपचार करण्यात आले.
दरम्यान, फिर्यादीवरून कैलास व विटकर दोघांवर मारहाण करणे व व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.