बारामतीत थारचालकाचा हैदोस! वाहतूक पोलिसाला बोनेटवरून ५० फूट फरफटत नेले; जीवे मारण्याचा प्रयत्न


बारामती : बारामती शहरात वाहतूक पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर भरधाव महिंद्रा थार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सम्यक चौकात बुधवारी (ता. २५ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, चालकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज दत्तात्रय शेडगे असे गुन्हा दाखल झालेल्या थारचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सम्यक चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी ते महिंद्रा थार (क्र. MH-53-A-4400) या वाहनावर ई-चलन मशीनद्वारे कारवाई करत होते.

दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी चालक धीरज शेडगे याने अचानक वाहनाचा वेग वाढवला आणि थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. यामुळे संबंधित कर्मचारी थेट थारच्या बोनेटवर पडले. मात्र, चालकाने वाहन न थांबवता त्यांना बोनेटवरूनच सुमारे ४० ते ५० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले.

या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या डाव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेनंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), १३२, १२१(१), २२१, २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक भंडारे यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पुजारी पुढील तपास करत आहेत. भरचौकात पोलिसांवरच झालेल्या या हल्ल्यामुळे बारामती शहरात खळबळ उडाली असून, फरार थारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!