पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळ गाठता येणार अवघ्या 20 मिनिटांत; दिवे घाटात 2 बोगदे होणार


पुणे : पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून, आगामी तीन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, विमानतळ सुरू होण्यापूर्वीच त्याला जोडणारी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून पुरंदर विमानतळापर्यंत अवघ्या 20 मिनिटांत पोहोचता यावे, यासाठी विशेष कनेक्टिव्हिटीची योजना आखण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देताना याबाबत घोषणा केली.

दिवे घाटात दोन बोगदे उभारणार

पुरंदर विमानतळापर्यंतचा प्रवास जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी दिवे घाटात दोन मोठे बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. यापैकी एक बोगदा मेट्रोसाठी, तर दुसरा रस्ते वाहतुकीसाठी प्रस्तावित आहे. दोन्ही बोगद्यांची लांबी सुमारे चार ते पाच किलोमीटर असण्याची शक्यता आहे.

या सुविधांमुळे विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते वाहतुकीसोबत मेट्रोचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो. विमानतळ सुरू होण्यापूर्वीच त्याची कनेक्टिव्हिटी विकसित करण्याच्या या नियोजनामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सोयीचा करण्याचा प्रयत्न आहे.

पुणे जिल्ह्याच्या विकासावरही भर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरंदर विमानतळासोबतच पुणे जिल्ह्यातील पर्यटनवाढ, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. तसेच चाकण आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.

पुरंदर विमानतळ आणि त्याला जोडणाऱ्या वाहतूक सुविधांचा विकास झाल्यास पुणे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!