अमरावतीच्या बंडखोरीचे पुणे-संभाजीनगरमध्ये पडसाद; महायुतीत नवी समीकरणं, शिंदे गटाची महत्त्वाची खेळी?

पुणे : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील घटकपक्षांना काही ठिकाणी बंडखोरी रोखण्यात यश आले असले, तरी काही जागांवर बंडखोर उमेदवार कायम असल्याने युतीसमोर पेच निर्माण झाला आहे.

निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. राज्यातील पाच जागांवरील निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
अमरावतीच्या बंडखोरीचे पुणे, संभाजीनगरमध्ये पडसाद


अमरावतीतील भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे महायुतीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला मदत करू शकते, तर संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघांत महायुतीतील पक्षांमध्ये परस्पर सहकार्याची समीकरणे तयार होत असल्याचे दिसत आहे.
बंडखोरांना रोखण्यासाठी हालचाली
अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित बंडखोरांमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. बंडखोरी शमवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न आणि दबाव वाढवण्यात येत असल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत आज अमरावती दौऱ्यावर आहेत. या घडामोडींमुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत राजकारणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
