पुण्यात विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी प्रियकराची हद्दच पार! तिच्या पतीची रिक्षा चोरली, प्लॅन ऐकून पोलीसही चक्रावले

पुणे : प्रेमसंबंधातून अनेकदा विचित्र घटना समोर येतात. पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित प्रेयसीला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी एका प्रियकराने थेट तिच्या पतीची रिक्षाच चोरल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा डाव उधळून लावला.

प्रेयसीच्या पतीचा रोजगार बंद झाला, तर आर्थिक अडचणींमुळे तो पत्नीला सोडून जाईल आणि आपला मार्ग मोकळा होईल, असा विचार आरोपीने केला होता. याच हेतूने त्याने दोन साथीदारांच्या मदतीने तब्बल १ लाख ३० हजार रुपये किमतीची रिक्षा चोरल्याची माहिती समोर आली आहे.
शिवाजीनगरमधील शिरोले रोडवरील दत्त वसाहतीत राहणारे सुभाष शंकरराव पासलकर (वय ४५) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीशी वाद सुरू होते. याच काळात त्यांच्या पत्नीचे मुकेश सीताराम पवार (वय ३६) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. महिला पतीसोबत होणाऱ्या वादांची माहिती प्रियकराला देत होती.


प्रेयसीच्या पतीचा रोजगार संपवण्याचा डाव
प्रेयसीला आपल्यासोबत राहता यावे, यासाठी मुकेशने तिच्या पतीचा रोजगारच बंद करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. रिक्षा चोरीला गेल्याने सुभाष यांचे उत्पन्न बंद होईल आणि आर्थिक अडचणींमुळे ते पत्नीपासून दूर जातील, असा त्याचा अंदाज होता.
मात्र, रिक्षा चोरीला गेल्यानंतर सुभाष पासलकर यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला असता या प्रकरणामागील कथित कट उघडकीस आला. विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी रचलेल्या या अजब योजनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
