आधी शहर बदललं, तरी संशय संपेना! पहाटे पत्नीवर लाकडी दांडक्याने वार; खुनानंतर पती थेट पोलीस ठाण्यात, माजी महापौरांशीही नातं काय?


छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड शहरात कौटुंबिक वादातून एका विवाहितेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे पती-पत्नीमध्ये गेल्या सहा ते सात महिन्यांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे. या वादातून पहाटे पाचच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यावर आणि तोंडावर लाकडी दांडक्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे.

मृत महिला माजी महापौरांची चुलत बहीण

रोहिणी मुकेश कुंभकर्ण (वय ४४) असे मृत महिलेचे नाव असून, मुकेश बाळकडू कुंभकर्ण असे आरोपी पतीचे नाव आहे. रोहिणी या छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांच्या चुलत बहीण असल्याची माहिती समोर आली आहे. कन्नड शहरातील गजानन कॉलनी परिसरात ही घटना घडली.

२००३ मध्ये विवाह; दोन मुलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि मुकेश यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता. त्यांना ईशान आणि निशा अशी दोन मुले आहेत. मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मुकेश याच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण झाला होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.

तीन महिन्यांपूर्वी घर सोडलं, पण वाद कायम

सततच्या वादामुळे हे दाम्पत्य सुमारे तीन महिन्यांपूर्वी कन्नड सोडून छत्रपती संभाजीनगर येथे भाड्याच्या खोलीत राहायला गेले होते. मात्र, शहर बदलल्यानंतरही त्यांच्यातील वाद थांबले नाहीत. अखेर ७ ऑक्टोबर रोजी दोघे पुन्हा कन्नड येथील घरी परतले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही घटना घडली.

पहाटे पाच वाजता नेमकं काय घडलं?

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा संशयाच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी मुकेश याने घरातील लाकडी दांडका उचलून रोहिणी यांच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार केल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापतींमुळे रोहिणी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

खुनानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात

पत्नीवर हल्ला केल्यानंतर मुकेश याने पळून जाण्याऐवजी थेट कन्नड शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे त्याने पत्नीला मारल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. मृत रोहिणी यांचे भाऊ रवींद्र घडामोडे यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायंकाळी अंत्यसंस्कार; तपास सुरू

रोहिणी यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता कन्नड शहरातील देवलोक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एल. दिंडे करत आहेत. कौटुंबिक वाद आणि संशयातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!