लग्न झालं अन् नवरीने खेळ केला! जेवणातून सासरच्या तिघांना विषारी औषध दिलं, नवरी-करवलीचा धक्कादायक कारनामा


जळगाव : लग्नानंतर पैसे आणि दागिने घेऊन पसार होण्याच्या उद्देशाने जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन एकाच कुटुंबातील तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात समोर आला आहे. वेल्हाणे येथे घडलेल्या या प्रकरणी सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघींना पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात अडचणी येत असल्याने काही जण विवाह जुळवून देणाऱ्या एजंटच्या माध्यमातून लग्न करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारातून पारोळा तालुक्यातील वेल्हाणे गावातील वाल्मिक ताराचंद पाटील या तरुणाचा ७ ऑक्टोबर रोजी सुमन सहाणी हिच्याशी घरगुती पद्धतीने विवाह झाला होता.

मात्र, लग्नानंतर पैसे आणि दागिने घेऊन पसार होण्याच्या उद्देशाने नवरी आणि तिच्यासोबत आलेल्या करवलीने कट रचल्याचा आरोप आहे. ९ ऑक्टोबर रोजी फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद पाटील आणि आई सरलाबाई पाटील यांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दोन्ही महिला पैसे घेऊन पसार झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर पक्षाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. वेल्हाणे येथील पोलीस पाटलांकडून माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान धुळ्याच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नवरीसह तिच्या करवलीला पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, या प्रकरणात विवाह जुळवून देणाऱ्या एजंटचा सहभाग आहे का, तसेच या महिलांनी यापूर्वी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

नागरिकांनी विवाह जुळवताना सावध राहावे

अनओळखी व्यक्ती किंवा एजंटच्या माध्यमातून विवाह जुळवण्याचा प्रयत्न करताना नागरिकांनी संबंधित व्यक्तींची आणि त्यांनी दिलेल्या माहितीची योग्य खातरजमा करावी. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतरच विवाहाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!